आपल्या तीन वर्षांच्या मुलीला गळफास देऊन आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (17 फेब्रुवारी) संध्याकाळी पाचच्या सुमारास बेगमपुरा परिसरात घडली. अमृता किशोर मुळे (वय 22 वर्षे) व अवंतिका मुळे (वय 3 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. अमृताच्या वाढदिवशीच ही घटना घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अमृताच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
बेगमपुरा परिसरातील थत्ते हौदाजवळील गणपती मंदिरासमोर मुळे कुटुंबिय राहते. अमृताचे सासरे दिलीप शंकरराव मुळे हे शहर पोलिस दलात सहाय्यक फौजदार आहेत. त्यांचा मोठा मुलगा किशोर व केज (जि. बीड) येथील अमृता यांचे तीन ते चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मुळे यांचा दुसरा मुलगा ईश्वरची पत्नीदेखील बीडची असून अमृताची नातेवाईक आहे. किशोर हा बीबी का मकबरा येथील पार्किंग ठेकेदाराकडे नोकरीला होता. 17 फेब्रुवारीला अमृताचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी घरी तयारी सुरू होती. अमृता दुपारी दीडच्या सुमारास मुलगी अवंतिकाला घेऊन दुसर्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेली होती. किशोरदेखील हॉलमध्ये झोपला होता. संध्याकाळी पाच वाजले तरी अमृता व अवंतिका या उठल्या नाहीत म्हणून कुटुंबियांनी खोलीचा दरवाजा ठोठावला;पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर किशोर व कुटुंबियांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा अवंतिका व अमृता दोघीही छताला असलेल्या लोखंडी हुकाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद बदक व अन्य कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. अमृता व अवंतिका यांना घाटीत उपचारासाठी नेण्यात आले. घाटी रूग्णालयातील डॉक्टरांनी दोघींना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुळे कुटुंबियांचे या भागातील सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या घरात कधीही भांडण झाले नाही, असे शेजार्यांनी सांगितले. घटनास्थळी चिठ्ठी किंवा इतर वस्तू सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.